सिरोंचा, तालुका प्रतिनिधी दिनांक:-02/06/2025. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा उपविभागात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेले जात असलेली गोवंशीय जनावरे पकडली असून, या प्रकरणात २० लाख ४० हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३४ गोवंशीय जनावरे आणि एक अशोक लेलँड ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर ट्रकमधून गोवंशांची अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक होत होती. या प्रकरणात एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिसांनी ही सापळा कारवाई केली. २ जून रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांना कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ट्रॅप लावून संशयित ट्रकचा पाठलाग सुरू केला. काही अंतर गेल्यानंतर सदर ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये ३४ गोवंशीय जनावरे मिळून आली. या जनावरांना मानेला आणि पायांना करकचून दोरखंडाने बांधून, एकमेकांच्या अंगावर गुदमरून कोंबलेले होते. गोवंशांची ही स्थिती पाहून त्यांच्या अमानुष हालअपेष्टांचा स्पष्ट अंदाज येत होता.
वाहनचालकाकडे या जनावरांच्या वाहतुकीसंबंधी कोणतेही वैध कागदपत्र सापडले नाहीत. पोलिसांनी त्वरित कारवाई करत ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, ही सर्व गोवंशीय जनावरे नांदगाव येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेली जात होती. पोलिसांनी सदर ट्रक आणि गोवंशीय जनावरे जप्त करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी रमेश बक्काना पोरला (वय ३५, रा. असिफाबाद) या आरोपीस ताब्यात घेतले असून, या अवैध वाहतुकीमागील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेली सर्व गोवंशीय जनावरे तत्काळ चंद्रपूर येथील अधिकृत गोशाळेत हलवण्यात आली असून, तिथे त्यांच्यासाठी चारा, पाणी आणि आवश्यक वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांची स्थिती लक्षात घेता त्यांना सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मा. प्रणिता मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सा.), सिरोंचा यांच्या समन्वयाने पार पडली. पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वी झाली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मारुती धरणे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी, तसेच पोलीस शिपाई उईके, दागम, मस्के, काकडे आणि नागूला यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या घटनेच्या अनुषंगाने सिरोंचा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध प्राणी वाहतूक, जनावरांची कत्तल किंवा यासंदर्भातील संशयास्पद हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा होण्यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आधीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गंभीर गुन्ह्यांवर यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. नुकतेच त्यांच्या तपासात एक सराईत घरफोड्या करणारा आरोपी अटक करण्यात आला होता आणि त्याच्याविरुद्ध ११ घरफोडीच्या केसेस उघड झाल्या होत्या.
सिरोंच्यातील ही कारवाई म्हणजे गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांची तडफदार भूमिका अधोरेखित करणारी घटना ठरली आहे. जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल नियंत्रणासाठी पोलिसांची तत्परता आणि दक्षता भविष्यात अशा बेकायदेशीर कृतींना लगाम घालणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
—