संजय भोयर राजकीय विश्लेषक गडचिरोली दिनांक:-01/06/2025 भारतीय जनता पार्टीने राज्यात संघटनात्मक बदलाची प्रक्रिया सुरू केली. राज्यात नव्या जिल्हाध्यक्षपदाची दुसरी यादी काल जाहीर झाली. लोकसभा व जिल्हयातील तिन्ही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने संघटनात्मक पदावर ओबीसी चेहऱ्याची निवड अपेक्षितच होती. जिल्हापरिषदेचे माजी कृषी सभापती रमेश बारसागडे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने पुन्हा ओबीसी कार्ड खेळले.
माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गडचिरोली भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरु झाल्याने कोणत्याही एका गटाचा शिक्का बसलेल्या पदाधिकाऱ्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिल्यास येणाऱ्या निवडणूकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता पक्षाने सर्वच गटाला चालणाऱ्या प्रा.रमेश बारसागडे या सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी दिली. प्रशांत वाघरे हे माजी खासदार अशोक नेते व विद्यमान आमदार डॉ मिलिंद नरोटे यांच्या जवळचे मानले जातात. माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी व प्रशांत वाघरे यांच्यात विस्तवही जात नव्हते तर दुसरीकडे दक्षिण गडचिरोलीतील भाजपच्या एका गटाला प्रशांत वाघरे यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे शांत संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व व बहुजन ओबीसी चेहरा असलेल्या रमेश बारसागडे यांच्या नावावर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपने शिक्कामोर्तब केले.मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने येणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थेत जिल्हयात पक्षाच्या यशापयशावर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात गटबाजीपासून अलिप्त राहून पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांचासमोर आव्हान असणार आहे. ते स्वतः जिल्हापरिषदेच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे