विशेष संपादकीय संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज २४ नेटवर्क। माओवाद्यांच्या प्रभावाखाली अनेक वर्षे अंधारात राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा आता हळूहळू बदलू लागला आहे. ही फक्त विकासाची गाथा नाही, तर शासन आणि नागरिकांमधील संवादाची नवी जाणीव आहे. या परिवर्तनाचा ठळक पुरावा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच झालेला कवंडे दौरा.
आजच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील कवंडे गावात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आदिवासी महिलांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा, अडचणी आणि गरजांची थेट जाण घेतली. ही एक औपचारिक भेट नव्हती. यामध्ये ना मोठे माईक होते, ना सजलेले मंडप, ना खास राजकीय भाषणं. फक्त जमिनीवर बसलेले मुख्यमंत्री आणि समोर आपल्याच मातीतील स्त्रियांच्या डोळ्यांतील प्रश्न.
गडचिरोलीमध्ये एखाद्या मुख्यमंत्रीचा आदिवासी भागात असा प्रत्यक्ष संवाद दुर्लभच मानावा लागेल. हा संवाद होता निसंकोच, पारदर्शक आणि मानवी. महिलांनी आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या संधी, मुलींच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत समंजसपणे प्रत्येक मुद्द्यावर लक्षपूर्वक ऐकले आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ कृतीचे आदेश दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, “या भागात केवळ बंदुकीने नाही तर संवादाने माओवादाचा मुकाबला करता येईल.” ही ओळ पूर्ण गडचिरोलीच्या भावनांना स्पर्श करणारी होती. कारण कित्येक वर्षे या भागातील जनता केवळ विकासाच्या वचनांवर जगत होती, पण अंमलबजावणीच्या पातळीवर फसवली जात होती.
आज आदिवासी महिला एका मुख्यमंत्र्याशी थेट संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणतात आणि शासनही त्यावर कृती करते, याचे श्रेय निश्चितच स्थानिक प्रशासनाच्या सक्रियतेबरोबरच फडणवीस यांच्या जमीनीवरच्या राजकारणालाही जाते.
ही केवळ एक भेट नव्हती; ही होती एका आश्वासनाची पुनर्पूर्ती. मुख्यमंत्री पदाचा मुलामा बाजूला ठेवून त्यांनी जमिनीवर बसून गडचिरोलीच्या मातीतून पुढे जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय दृष्टिकोन:
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात प्रशासनाचा विश्वास पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया ही केवळ विकासकामांपुरती मर्यादित राहू शकत नाही. जनतेच्या मनात विश्वासाचे बीज रुजवण्याची प्रक्रिया ही सहवास, संवाद आणि सहवेदनेतून घडते. मुख्यमंत्री फडणवीस यांचा कवंडेतील आजचा दौरा त्याचेच मूर्त उदाहरण होता.
हे दृश्य केवळ कॅमेऱ्यासाठी नाही, तर ते शासनाच्या अंतःकरणातून उमटणाऱ्या इच्छेचे प्रतीक ठरावे, अशी अपेक्षा आहे.
विशेष संपादकीय संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज २४ नेटवर्क:- 9421729671 9423502555