आरमोरीतील दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद; वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश..

आरमोरी विशेष प्रतिनिधी दिनांक: हा 11 डिसेंबर 2025 —
आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी नियतक्षेत्रामध्ये मागील महिन्याभरापासून नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दोन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणामुळे देऊळगाव, इंजेवारी आणि आजूबाजूच्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. 19 नोव्हेंबर रोजी देऊळगावात आणि 2 डिसेंबर रोजी इंजेवारी येथे दोन स्वतंत्र घटनांमध्ये महिलांवर हल्ला करून त्यांना ठार करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीसोबतच संतापही वाढला होता. त्यामुळे स्थानिकांनी तत्काळ हा बिबट्या पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश निर्गमित केले. आदेश मिळताच वडसा वनविभागाच्या उपवनसंरक्षक वरुण बी. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक आर. एस. सुर्यवंशी यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण आर. बडोले यांच्या नेतृत्वात वनकर्मचारी, तज्ञ पथक आणि जलद बचाव दल एकत्रितपणे सलग अनेक दिवस जंगलात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेत होते.
शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचाही व्यापक वापर करण्यात आला. संभाव्य वावर असलेल्या पट्ट्यात 25 ट्रॅप कॅमेरे, 5 CCTV लाईव्ह कॅमेरे आणि 2 अत्याधुनिक ड्रोन उडवून बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण केले जात होते. दिवस-रात्र सलग न थांबता सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शेवटी आज सकाळी बिबट्याचे नेमके स्थान शोधणे शक्य झाले.
जलद बचाव पथकाने काळजीपूर्वक आणि अत्यंत अचूकतेने बिबट्याला ट्रँक्विलाइज करून बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे जेरबंद केले. पथकातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे यांनी तत्काळ त्याची तपासणी केली आणि ते पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर पुढील उपचार व निगराणीसाठी त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपूर येथे हलविण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेत वडसा व पुराडा वनपरिक्षेत्रातील अधिकारी श्री के. आर. धोंडणे, श्री रविंद्र चौधरी तसेच जीवशास्त्रज्ञ श्री ललित उरकुडे आणि RRT गडचिरोलीचे सदस्य भाऊराव वाढई, अजय कुकडकर, मकसूद अली सय्यद, निखील बारसागडे, कुणाल निमगडे आणि गुनवंत बावनवाडे यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वय, धाडस आणि संयमामुळेच ही गुंतागुंतीची मोहीम यशस्वी झाली.
बिबट्याला जेरबंद केल्यानंतरही वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि विनाकारण जंगल परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. परिसरात इतर वन्यजीवांचा वावर असल्याने अनावश्यक धोक्यात न पडता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
— विदर्भ न्यूज 24
निष्पक्ष • निर्भीड • जनआवाजासाठी कटिबद्ध