सिरोंचा / गडचिरोली दिनांक : 1 मार्च 2026
होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पंचांगानुसार तिथी, मुहूर्त आणि चंद्रग्रहणासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती महाराज सीताराम गणपती, सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील पुरोहित यांनी दिली आहे.
पंचांगानुसार दिनांक ०२ मार्च २०२६, सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजून ०७ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे याच दिवशी होलिका दहन (होळी) करण्याचा शुभ मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले. परंपरेनुसार सूर्यास्तानंतर होलिका दहन करणे शास्त्रसम्मत मानले जाते.
त्यानंतर दिनांक ०३ मार्च २०२६, मंगळवार रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होत आहे. हे ग्रहण भारतात दृश्यमान असणार असून, विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही ते स्पष्टपणे दिसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रहणाचा सूतक (बेध) सकाळी ११ वाजल्यापासून लागू होणार आहे.
या काळात धार्मिक परंपरेनुसार सकाळी ११ वाजण्यापूर्वी देवपूजा, अभिषेक, भोजन आदी कार्ये करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सूतक काळात पूजा, स्वयंपाक व धार्मिक विधी टाळावेत. चंद्रग्रहणाचा मोक्ष सायंकाळी सुमारे ६ वाजता होणार असून, त्यानंतर घराची शुद्धी, स्नान, देवपूजा करून मगच भोजन करावे, असेही सांगण्यात आले.
विशेषतः बालक, वृद्ध, आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांनी सकाळी ११ वाजल्यापासून सूतक पाळणे आवश्यक असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
हे चंद्रग्रहण पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीतून होणार असल्याने काही राशींवर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. विशेषतः कर्क आणि सिंह राशीतील व्यक्तींनी संयम राखून धार्मिक नियमांचे पालन करावे, असे सूचित करण्यात आले आहे. तसेच ज्यांच्या जन्मनक्षत्रावर या ग्रहणाचा प्रभाव येतो, त्यांनी मानसिक स्थैर्य व आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
एकूणच होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहण हे तिन्ही धार्मिक-खगोलिय घटनांचे योगायोगाने एकत्र आगमन होत असल्याने नागरिकांनी पंचांगानुसार नियम पाळून सण साजरे करावेत, असे आवाहन महाराज सीताराम गणपती यांनी केले आहे.
— विदर्भ न्यूज 24
