सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 2 मार्च 2026
स्वस्ति श्री विश्वावसु नाम संवत्सरातील फाल्गुन पौर्णिमा हा दिवस यंदा अनेक धार्मिक आणि खगोलशास्त्रीय घडामोडींमुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. दिनांक 02 मार्च 2026 रोजी सकाळी 5.46 वाजल्यापासून फाल्गुन पौर्णिमेला प्रारंभ होत असून, तिचा कालावधी 03 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.26 वाजेपर्यंत आहे. याच पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार असल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः होलिका दहनाच्या वेळेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिरोंचा तालुका व परिसरात हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित स्वरूपाचे असणार आहे. म्हणजेच चंद्रउदय हा ग्रहणग्रस्त अवस्थेत होणार आहे. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजून 39 मिनिटांनी संमिलन, सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी मध्य तर सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी मोक्ष होणार आहे. ग्रहणाचा प्रभाव चंद्रउदयापर्यंत असल्याने धार्मिक परंपरेनुसार सायंकाळी 6.45 नंतरच देवघर व घराची शुद्धी करून भोजन करणे योग्य ठरते.
दरम्यान, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा होलिका दहन हा सण श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा होलिका दहन पौर्णिमा ही 02 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुरू होत आहे. त्यामुळे त्या वेळेनंतर आणि रात्री 8 वाजेपर्यंत होलिका दहन करणे हे शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र सध्या सोशल मीडिया, यूट्यूब आणि काही अप्रमाणित पंचांगांच्या माध्यमातून “होलिका दहन रात्री 12.25 वाजता करावे” असे संदेश मोठ्या प्रमाणावर पसरवले जात आहेत. हे संदेश नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असून, त्याला कोणताही ठोस शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष व्यवहारातही मध्यरात्री होलिका दहन करणे शक्य नसते आणि ते ग्रामपरंपरा व समाजजीवनाशी विसंगत आहे.
या संपूर्ण विषयावर सिरोंचा तालुक्यातील पुरोहित श्री वेंकटरमण कोम्मेरा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, ग्रहण, पौर्णिमा आणि होलिका दहन यांचे वेळापत्रक वेदशास्त्र व पंचांगांच्या आधारे निश्चित केलेले असते. अफवा, अपूर्ण माहिती किंवा सोशल मीडियावरील तथाकथित तज्ज्ञांच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे चुकीचे असून, 02 मार्च रोजी सायंकाळीच होलिका दहन करणे हेच योग्य आणि शास्त्रसंमत आहे.
होलिका दहन हा केवळ एक धार्मिक विधी नसून, अन्याय, असत्य आणि दुष्ट प्रवृत्तींच्या दहनाचे प्रतीक आहे. त्यामुळे या सणाच्या दिवशी गोंधळ, गैरसमज आणि अफवांना थारा न देता, विवेकबुद्धीने आणि परंपरेनुसारच सण साजरा करणे गरजेचे आहे. श्रद्धा ही अंधश्रद्धा बनू नये आणि परंपरा ही अफवांखाली दबली जाऊ नये, हाच या दिवशीचा खरा संदेश आहे.
नागरिकांनी शांतता, संयम आणि परंपरेचे भान ठेवत फाल्गुन पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि होलिका दहन साजरे करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
