सिरोंचा तालुका प्रतिनिधी दिनांक:-09जुन 2026
काल रात्रीपासून सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असून तब्बल २४ तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक गावांमध्ये घरगुती वापरासाठी तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मोबाईल टॉवर बंद पडल्याने दूरसंचार सेवा आणि इंटरनेट नेटवर्कही ठप्प झाले असून नागरिकांचा बाह्य जगाशी संपर्क तुटण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील शासकीय कार्यालये, बँका, व्यापारी प्रतिष्ठाने, लघुउद्योग तसेच विविध सेवा क्षेत्रांवर या वीजखंडितीचा गंभीर परिणाम झाला आहे. विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यवसायिक व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, वीजपुरवठा कधी सुरू होणार याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्ट उत्तर नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास “एक तासात वीज येईल” असे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक तास उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे महावितरणच्या दाव्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पहिल्याच पावसात वीजयंत्रणा कोलमडल्याने महावितरणच्या पूर्वतयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि ट्री कटिंगची कामे करण्यात आली असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळेच चित्र दर्शवत आहे. जर एका पावसानेच संपूर्ण तालुका २४ तास अंधारात जाऊ शकत असेल, तर आगामी पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि वरिष्ठ महावितरण अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल
“२४ तास उलटूनही वीज नाही, पाणी नाही, नेटवर्क नाही. महावितरणकडे फक्त आश्वासने आहेत, पण प्रत्यक्षात समस्या सोडविण्याची कोणतीही तत्परता दिसून येत नाही.”
— विदर्भ न्यूज 24
