सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-27मे 2026
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या “पिकवलं धान, पण विकायचं कुठे?” असा जिव्हाळ्याचा आणि तितकाच गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. चार ते पाच महिने कडक उन्हात, पावसात आणि संकटांशी झुंज देत शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेलं भात पीक आता घरासमोर आणि शेतात पडून आहे. मात्र शासनाकडून अद्याप धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. परिणामी हजारो शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
सिरोंचा तालुका हा भात उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे खरीप हंगामात भात पिकावरच अवलंबून असतात. अनेकांनी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलून बियाणे, खत, औषधे आणि मजुरीचा खर्च केला. काहींनी सोनं गहाण ठेवलं, तर काहींनी कर्ज काढून शेती उभी केली. आता पीक हातात आलं असलं तरी विक्रीचाच मार्ग बंद झाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे धानाचे पोते घरासमोर, अंगणात आणि रस्त्यालगत उघड्यावर पडून आहेत. अवकाळी पाऊस किंवा खराब हवामान झाल्यास लाखो रुपयांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उघड्यावर साठवलेल्या धानाला ओलावा, जनावरे आणि कीड यांचाही धोका वाढला आहे.
दरवर्षी अनेक शेतकरी लगतच्या तेलंगणा राज्यातील बाजारपेठांचा पर्याय निवडत असत. मात्र यंदा तेलंगणा सरकारने धान वाहतुकीसंदर्भात सीमा नियंत्रण कडक केल्याने शेतकऱ्यांसाठी तो मार्गही बंद झाला आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने वेळेत धान खरेदी केंद्र सुरू केली नाहीत तर त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. आधीच शेतीमालाला योग्य दर नाही, त्यात विक्रीसाठी व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकरी सांगतात की, “चार महिने जीव तोडून मेहनत केली. कर्ज काढून शेती केली. आता धान विकता येत नाही. सावकार दररोज पैशासाठी तगादा लावत आहेत. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू केली नाहीत तर आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ.”
सिरोंचा तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासन आणि शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला हमीभावासह त्वरित खरेदीची व्यवस्था करावी, नवीन खरेदी केंद्रे सुरू करावीत तसेच वाहतूक आणि साठवणुकीसाठी मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण हा केवळ धान विक्रीचा प्रश्न नाही, तर हजारो कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न बनला आहे….
#Sironcha #PaddyFarmers #धानखरेदी #FarmerCrisis #VidarbhaNews24 #Gadchiroli #SironchaFarmers #धानसंकट #शेतकरीप्रश्न #MaharashtraFarmers #TelanganaBorder #RiceProcurement #BreakingNews

