गडचिरोली प्रतिनिधी दिनांक :12 जुलै 2026
चामोर्शी येथे सात वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी जलद तपास करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घटनेनंतर अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली आणि केवळ २८ दिवसांच्या आत संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याचा खटला जलदगतीने चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
दिनांक ८ जून २०२६ रोजी चामोर्शी येथे आरोपी प्रज्वल ऊर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५, रा. चामोर्शी) याने एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या घराच्या स्लॅबच्या भिंतीचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे स्वतः हाती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला अवघ्या १२ तासांत अटक केली.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी सन २०१९ मध्ये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बाबही उघड झाली. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले असून पोलिसांनी सर्व पुरावे काटेकोरपणे संकलित करत अल्पावधीत तपास पूर्ण केला. परिणामी, घटनेनंतर अवघ्या २८ दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी केला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अशा प्रकरणांचा जलद तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यात येतील, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि समाजात कायद्याबाबत विश्वास अधिक दृढ होईल.
पीडित बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये गडचिरोली पोलिसांनी दाखविलेली ही तत्परता आणि वेळेत पूर्ण केलेली तपास प्रक्रिया न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद आणि प्रभावी कारवाईचा हा एक उल्लेखनीय नमुना ठरत आहे.
