गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 12 जुलै 2026
Bहरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळणे अनेकदा अशक्य मानले जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आधुनिक सायबर विश्लेषणाच्या बळावर ही समजूत खोटी ठरवत तब्बल ११ हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल चोरी आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांना विशेष दक्षता घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दाखल झालेल्या मोबाईल हरवणे व चोरीच्या प्रकरणांचा सखोल तपास हाती घेण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आधुनिक तांत्रिक साधने, मोबाईल ट्रॅकिंग प्रणाली आणि सायबर विश्लेषणाचा प्रभावी वापर करून विविध ठिकाणी असलेले ११ मोबाईल फोन शोधून काढले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० जुलै २०२६ रोजी कुरखेडा पोलीस ठाण्यात संबंधित नागरिकांना बोलावून त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आणि त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
पोलीस प्रशासनाने यावेळी नागरिकांना महत्त्वाचे आवाहनही केले आहे. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास त्याचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटना घडताच वेळ न दवडता तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवरही मोबाईल ब्लॉक करण्यासाठी तक्रार दाखल करावी. यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखण्यास मदत होते.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात मसपोनि. प्रियंका राजकुमार आघाव तसेच पोलीस अंमलदार पंकज नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.
गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केवळ नागरिकांचा आर्थिक तोटा भरून निघाला नाही, तर पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासही अधिक दृढ झाला आहे. सायबर गुन्हे आणि मोबाईल चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्याने तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सतर्क असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
— विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
