आष्टी (गडचिरोली) विदर्भ न्यूज 24 दिनांक:- 28 जून 2026
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी–घोट मार्गावरील बामणपेठ गावाजवळ रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिदास अमल गाईन (वय २५, रा. लगाम, ता. मूलचेरा) हे त्यांची आते बहीण कनिका ब्रजकेश दास ऊर्फ कनिका विश्वजीत मंडल (वय २८) हिला तिच्या घरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यांच्यासोबत कनिकाची दोन लहान मुलेही होती.
सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बामणपेठ गावाजवळील जंगल रस्त्यावर आरोपी ब्रजकेश ठाकूर दास (वय ३४, रा. विकासपल्ली, ता. चामोर्शी) याने दुचाकीला मागून पायाने धक्का मारून ती अडवली. त्यानंतर फिर्यादी व पीडितांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपीने पत्नी कनिका हिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. तिच्या पोटावर, मानेवर तसेच दोन्ही हात व पायांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. हा प्रकार सहा वर्षांच्या मुलासमोर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. फिर्यादी हरिदास गाईन यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), २९६ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन मुकुंदराव मस्के करीत असून पोलीस निरीक्षक विशाल प्रकाशराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
