अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 30 जून 2026
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने छेडलेल्या आंदोलनावर भाजपचे नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्थानिक आमदारांविरुद्ध एक शब्दही न बोलता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करण्यात आले असून, यावरून राष्ट्रवादीचे दोन्ही गट प्रत्यक्षात एकत्रितपणे राजकारण करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची पदे रिक्त असल्याच्या निषेधार्थ “ताळा ठोको” आंदोलन करण्यात आले असून त्यानंतर उपोषणालाही सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, अहेरीचे स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडणे अपेक्षित होते. असे असताना त्यांच्यावर कोणतीही टीका न करता थेट मुख्यमंत्र्यांनाच जबाबदार धरणे हे राजकीय सोयीचे असल्याचा आरोप गुडेल्लीवार यांनी केला.
यावेळी त्यांनी अहेरी नगरपंचायत पोटनिवडणूक, सिरोंचा नगरपंचायत तसेच बाजार समितीतील अविश्वास ठरावाच्या घटनांचा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अनेक ठिकाणी एकत्रित भूमिका घेतल्याचा दावा केला. जनतेची दिशाभूल करून सोयीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असून अहेरीतील जनता अशा राजकारणाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व बाल रुग्णालयाच्या इतिहासाचाही उल्लेख करत गुडेल्लीवार म्हणाले की, तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात २०१० मध्ये मंजूर झालेले महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागेचा प्रश्न मार्गी लावत हे रुग्णालय पुन्हा अहेरीस मंजूर केले. अशा परिस्थितीत त्यांच्यावरच आरोप करणे म्हणजे “उलटा चोर कोतवाल को डाँटे” असा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
अहेरी रुग्णालयातून सहा डॉक्टरांनी नुकतेच राजीनामे दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांच्या अरेरावी भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर बोट दाखविणे म्हणजे “चोराला सोडून संन्याशाला फाशी” देण्यासारखे असल्याचा घणाघात त्यांनी केला.
आरोग्य विभागाने तातडीने सहा डॉक्टरांची अहेरी येथे प्रतिनियुक्ती केली असून कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत सध्याचे आंदोलन हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याची टीकाही नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी केली.
दरम्यान, महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, त्यावरून सुरू झालेले आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
– विदर्भ न्यूज 24
