गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक 14 ऑगस्ट 2026
माओवादविरोधी लढ्यात आपल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची सातत्याने छाप उमटविणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याचा देशपातळीवर पुन्हा एकदा गौरव झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये गडचिरोली पोलीस दलातील तब्बल २० अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय २५ वर्षांपेक्षा अधिक काळ निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २७ अधिकारी-अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर १५ वर्षांपेक्षा अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या तीन अधिकारी-अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पोलीस दल तसेच इतर सशस्त्र दलांमध्ये कर्तव्य बजावताना असामान्य शौर्य, धाडस, समर्पण आणि उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व जवानांचा केंद्र शासनाकडून गौरव केला जातो. यावर्षी १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पदकांमध्ये देशभरातील पोलिसांना विविध श्रेणीतील पदके जाहीर झाली असून, त्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचा विशेष ठसा उमटला आहे.
गडचिरोली हा माओवादाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुर्गम जंगल परिसर, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि माओवाद्यांच्या आव्हानांमध्ये कर्तव्य बजावताना गडचिरोली पोलिसांनी अनेकदा प्राणाची पर्वा न करता धाडसी कारवाया केल्या आहेत. त्याच शौर्याची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत यंदा २० अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
या शौर्य पदकासाठी पोलीस अधीक्षक, पालघर तथा तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक (अभियान), गडचिरोली यतिश विजयराव देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पांडुरंग गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव राजम मडावी, पोलीस हवालदार दिलीप विठ्ठल आत्राम, पोलीस हवालदार मासा बोरा आत्राम, पोलीस हवालदार विजय किष्टय्या कोडापे, नापोअं दशरथ रामशहा मडावी, पोलीस अंमलदार अजय गोपालराव मडावी, गणेश चंद्रम डुब्बुला, विजय झुरु मडावी, भुपेश मारोतराव जुमनाके, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोरतेट, श्रीनिवास समय्या निष्ठुरी, गणेश हनमंतू गंजीवार, नितेश प्रभुदास टेंभेकर, शिवाजी मेस्सो हिचामी, संजय मल्लेश कंकाबंडावार, राजेश शामराव किरंगे आणि दलसु कटिया बोगामी यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व अधिकारी व अंमलदारांच्या शौर्यामागे गडचिरोलीच्या जंगलात झालेल्या माओवादविरोधी कारवायांचा मोठा वाटा आहे. सन २०२३ मध्ये भामरागड तालुक्यातील केडमारा येथे तसेच सन २०२४ मध्ये भामरागड तालुक्यातील कंत्रनगट्टा परिसरात झालेल्या पोलीस-माओवादी चकमकींमध्ये गडचिरोली पोलिसांना एकूण सहा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेल्या धैर्यपूर्ण आणि यशस्वी कामगिरीची केंद्र शासनाने दखल घेत त्यांच्या नावांची राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकासाठी निवड केली आहे.
गडचिरोली पोलीस दलासाठी यंदाचे वर्ष विशेष गौरवाचे ठरले आहे. सन २०२६ मध्ये आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाला एकूण ३१ पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली आहेत. त्याचबरोबर मागील पाच वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलीस दलाने ३ शौर्य चक्र, २३७ पोलीस शौर्य पदके आणि ७ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपल्या शौर्याची आणि कर्तव्यनिष्ठेची भक्कम नोंद केली आहे.
दरम्यान, माओवादविरोधी कारवायांबरोबरच दीर्घकाळ निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांचाही केंद्र शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. पोलीस दलात २५ वर्षांपेक्षा अधिक काळ निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २७ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर १५ वर्षांपेक्षा अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या ३ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली पोलीस दलातील दीर्घकाळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालाही राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला आहे.
गडचिरोली पोलीस दलासाठी हा सन्मान केवळ पदकांचा गौरव नसून, प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदाराच्या धैर्याला मिळालेली राष्ट्रीय पावती मानली जात आहे. माओवादविरोधी अभियानात जीवाची पर्वा न करता जंगलात उतरून कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करताना त्यांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आणि संवेदनशील भागात प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या या अधिकारी-अंमलदारांचा राष्ट्रपती पदकाने झालेला सन्मान हा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
— विदर्भ न्यूज-24 नेटवर्क | गडचिरोली
