गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक:-13नोव्हेंबर 2026
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी कला, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचा भव्य सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक आदिवासी नृत्य, गायन, वाद्य वादन, हस्तकला, चित्रकला, आधुनिक डिजिटल कलाविष्कार, आदिवासी धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचे प्रदर्शन आणि महान आदिवासी नायकांच्या शौर्यगाथांचे नाट्यमय सादरीकरण अशी विविध आकर्षणे या कार्यक्रमात असणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील एवढ्या व्यापक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन होत असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील आदिवासी कलाकार, विद्यार्थी, नवोदित कलावंत आणि कलाप्रेमी यामध्ये सहभागी होणार आहेत. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणे आणि आधुनिक माध्यमांतून या संस्कृतीची ओळख देशभर पोहोचविणे, हा या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे.
*आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*
‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रसिद्ध विनोदी अभिनेते भरत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्थानिक खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार असून नागरिकांना विविध आदिवासी कला आणि परंपरांचा एकाच ठिकाणी अनुभव घेता येणार आहे.
*पारंपरिक आदिवासी कलांचा रंगतदार आविष्कार*
भगवान बिरसा कला संगमाचे पहिले प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक आदिवासी कलांचे सादरीकरण. यामध्ये आदिवासी नृत्य, लोकगायन, पारंपरिक वाद्य वादन, चित्रकला आणि हस्तकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजाच्या दैनंदिन जीवनाशी, निसर्गाशी, सण-उत्सवांशी आणि सामाजिक परंपरांशी जोडलेल्या लोककलांचे दर्शन या स्पर्धांमधून घडणार आहे. विविध भागांतील कलाकार आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलींचे सादरीकरण करणार असल्याने आदिवासी संस्कृतीतील विविधता आणि कलात्मक समृद्धी अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
पारंपरिक नृत्यांचा ठेका, लोकसंगीताचा नाद, वाद्यांची लय आणि हस्तकलेतील कौशल्य यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे जिवंत चित्र या महोत्सवात उभे राहणार आहे. विशेषतः नवोदित आणि स्थानिक कलाकारांना आपली कला मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळणार आहे.
*डिजिटल माध्यमातून आदिवासी संस्कृतीला आधुनिक ओळख*
या महोत्सवाचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे डिजिटल आदिवासी कलाविश्व. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत आणि जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
याअंतर्गत रील्स, ब्लॉग्स, व्ह्लॉग्स, फोटोग्राफी, लघुपट, माहितीपट आणि पोस्टर सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून आदिवासी तरुणाईला आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
आदिवासी लोकजीवन, पारंपरिक ज्ञान, कला, उत्सव, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक जीवन यांचे डिजिटल माध्यमातून सादरीकरण करण्यास या उपक्रमातून प्रोत्साहन मिळणार आहे. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा उपक्रम आदिवासी सांस्कृतिक वारशाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*आदिवासी देव-देवता, पूजाविधी आणि जीवनपरंपरांचे विशेष दर्शन*
महोत्सवाचे तिसरे प्रमुख आकर्षण म्हणजे आदिवासी समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे विशेष प्रदर्शन. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित या प्रदर्शनातून आदिवासी समाजातील देव-देवता, श्रद्धा, पारंपरिक पूजाविधी आणि विविध संस्कारांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
आदिवासी समाजातील सण-उत्सव, दैनंदिन जीवनपद्धती, विवाह संस्कार, अंत्यसंस्काराशी संबंधित परंपरा आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक प्रथांची माहिती या प्रदर्शनातून नागरिकांना मिळणार आहे.
आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते, सामुदायिक जीवनपद्धती, पारंपरिक श्रद्धा आणि पिढ्यान्पिढ्या जतन केलेल्या सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. आदिवासी समाजाच्या विविध परंपरांचा परिचय होण्याबरोबरच त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांविषयी व्यापक जनजागृती होण्यास या उपक्रमातून मदत होणार आहे.
*भगवान बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या शौर्यगाथांचे नाट्यमय सादरीकरण*
महोत्सवाचे चौथे प्रमुख आकर्षण म्हणजे आदिवासी समाजातील महानायकांच्या प्रेरणादायी इतिहासाचे नाट्यरूप सादरीकरण. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाटिका तसेच ‘वनगर्जना : स्टोरी ऑफ राणी दुर्गावती’ हा विशेष नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला संघर्ष, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेले कार्य आणि स्वाभिमानाची जागृती यांचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यावरील नाटिकेतून घडणार आहे.
त्याचप्रमाणे वीरांगना राणी दुर्गावती यांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणादायी गाथा ‘वनगर्जना’ या सादरीकरणातून उलगडणार आहे.
या कलाविष्कारांमधून आदिवासी समाजाच्या इतिहासातील संघर्ष, त्याग, नेतृत्व आणि स्वाभिमानाचा वारसा नव्या पिढीसमोर मांडण्यात येणार आहे. विशेषतः तरुण पिढीला आदिवासी महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या सादरीकरणांचा उद्देश आहे.
*आदिवासी अस्मिता आणि सांस्कृतिक वैभवाचा राष्ट्रीय जागर*
भगवान बिरसा कला संगम २.० हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून आदिवासी समाजाची अस्मिता, समृद्ध परंपरा, कलावैभव आणि गौरवशाली इतिहास यांचा उत्सव आहे. पारंपरिक आदिवासी कला, आधुनिक डिजिटल कलाविष्कार, सांस्कृतिक प्रदर्शन आणि प्रेरणादायी शौर्यगाथा अशा चार प्रमुख आकर्षणांमधून आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत.
या आयोजनामुळे स्थानिक आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असून आदिवासी कला व संस्कृतीच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराला नवी दिशा मिळणार आहे. गडचिरोलीच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवी उंची देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या भव्य सांस्कृतिक सोहळ्यात आदिवासी कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, कलाप्रेमी आणि आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीदिनी रविवार, १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाचा मुख्य राष्ट्रीय सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

—


