अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:- 04 जुलै 2026
अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर निर्माण झालेल्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी थेट मुंबईतील विधानभवनात जाऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत रुग्णालयातील समस्यांकडे लक्ष वेधले. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीमुळे आरोग्य यंत्रणेत निर्माण झालेल्या असंतोषाची सखोल चौकशी करून त्यांना तातडीने जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, तसेच अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करून पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.
अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील अनेक डॉक्टरांनी नुकतेच राजीनामे दिल्यामुळे आरोग्य सेवा अक्षरशः विस्कळीत झाली होती. गर्भवती महिला, नवजात बालके आणि ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार आणि संजय पोहणेकर यांनी विधानभवनात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन अहेरीतील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कथित हेकेखोर व मनमानी कारभारामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने बदली करावी आणि अहेरीतील आरोग्य व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर डॉक्टर पाठविण्यात आले असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या प्रशासकीय आणि वैद्यकीय अडचणींचाही तपशील आरोग्यमंत्र्यांसमोर मांडला. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी पदभरती करून अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे हाच दीर्घकालीन पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. तसेच अहेरी महिला व बाल रुग्णालयात लवकरात लवकर आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसादही त्यांनी दिला.
दरम्यान, आरोग्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे अहेरी महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत होईल आणि परिसरातील हजारो रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
