गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 28 जून 2026
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीवर निर्णायक घाव घालत गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा शोधून काढत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन, क्लेमोर व बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, रायफल निर्मितीसाठी लागणारे साहित्य आदी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार हे संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी संघटना आता जवळपास संपुष्टात आली असली तरी उरलेले माओवादी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात गुप्तपणे शस्त्रनिर्मिती व स्फोटक साहित्य साठवून ठेवत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध शोधमोहीम हाती घेतली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी विशेष अभियान पथक (एसपीओ), प्राणहिता युनिटच्या सहा तुकड्या, बीडीडीएसचे एक पथक आणि सीआरपीएफचे जवान बालबेडा जंगल परिसरात रवाना झाले. २७ जून रोजी संपूर्ण परिसराला घेराव घालून बीडीडीएसच्या जवानांनी सखोल तपासणी केली असता माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला.
या कारवाईत सुमारे ५ ते ६ टन वजनाची एक लेथ मशीन, १५० क्लेमोर व बीजीएल पाईप्स, २२० नग १२ बोअर पाईप, २० रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने हे संपूर्ण साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
यापूर्वी २३ मे आणि २७ मे २०२६ रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये माओवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे माओवाद्यांच्या शस्त्रपुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.
या धाडसी मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विशेष कौतुक करत त्यांच्या कामगिरीचे अभिनंदन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे त्यांच्या संघटनात्मक आणि लष्करी क्षमतेवर मोठा परिणाम होत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
