गडचिरोली प्रतिनिधी दिनांक:- ४ ऑगस्ट २०२६
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाच्या उरलेल्या हालचालींना निर्णायक धक्का देणारी मोठी कारवाई गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल १४ अग्निशस्त्रे, आयईडी स्फोटक, एसएलआर मॅगझिन, बीजीएल लॉन्चर्स व इतर युद्धसाहित्य हस्तगत करण्यात आले असून, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोमके बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही कारवाई सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असली तरी, सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी माओवादी पूर्वीपासूनच दुर्गम जंगल परिसरात शस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवत असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. विशेषतः महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील दाट जंगलांचा वापर करून नक्षलवादी हे साहित्य जमिनीत पुरून ठेवत असत आणि नक्षल सप्ताह, निवडणुका किंवा सुरक्षा दलांच्या हालचालीदरम्यान त्याचा वापर करण्याचा त्यांचा कट असे.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या मौजा कुमनार जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व स्फोटके लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ३१ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान राबविण्यात आले. प्राणहिता येथील विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बीडीडीएसचे एक पथक आणि सीआरपीएफच्या जवानांनी जंगल परिसरात सखोल शोधमोहीम सुरू केली.
१ ऑगस्ट २०२६ रोजी परिसराला घेरा घालून बीडीडीएसच्या जवानांनी कसून तपासणी केली असता जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला. या कारवाईत १ एसएलआर रायफल, १ .३०३ रायफल, ७ बारा बोअर रायफल, ३ सिंगल शॉट रायफल, २ बीजीएल लॉन्चर्स, ३ एसएलआर मॅगझिन, १ आयईडी स्फोटक आणि २ बॅटऱ्या असा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा वापर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी करण्यात येणार होता, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी २३ मे, २७ मे आणि २७ जून २०२६ रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे माओवादी संघटनांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
या धाडसी आणि यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्तीच्या दिशेने सुरू असलेल्या मोहिमेत ही कारवाई आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
