सिरोंचा प्रतिनिधी दिनांक 3 ऑगस्ट 2026
सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली येथे आज सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात ५५ वर्षीय शेतकरी शंकर लस्मैय्या हरी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कारसपल्ली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ येथून चेन्नईकडे जात असलेली टाटा कंपनीची नवीन ‘मार्कोपोलो (Marcopolo)’ बस कारसपल्ली मार्गावरून जात होती. ही बस नव्याने तयार करण्यात आलेली असून ती गंतव्यस्थानी नेण्यात येत होती. बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. चालक एकटाच बस चालवत होता.
दरम्यान, कारसपल्ली येथील ५५ वर्षीय शेतकरी शंकर लस्मैय्या हरी हे आपल्या शेतातील काम आटोपून रस्ता चढून घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कंपनीच्या मार्कोपोलो बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात बसच्या पुढील काचेचेही मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत शंकर हरी यांना ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून प्रभारी पोलीस अधिकारी मारुती नंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण, बसचा वेग आणि चालकाची निष्काळजीपणा याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.
मृत शंकर लस्मैय्या हरी हे मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात मोठे कुटुंब असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. या दुःखद घटनेमुळे कारसपल्ली गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी तसेच या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
