अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक.:-18सप्टेंबर 2026
अहेरी तालुक्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात अहेरी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, कोलपल्ली येथे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.५० ते सायंकाळी ४.१० वाजताच्या दरम्यान अहेरी पोलिसांनी कोलपल्ली परिसरातील एका संशयिताच्या राहत्या घराची पाहणी केली. यावेळी घराच्या पहिल्या बोळीत पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर दारूची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा आरोप असून, पोलिसांनी तत्काळ हा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या कारवाईत ५०० मिली क्षमतेचे Harward 5000 कंपनीचे बिअर टीन कॅनचे सहा बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये २४ कॅन याप्रमाणे एकूण १४४ बिअर कॅन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची अवैध विक्री किंमत अंदाजे ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याशिवाय ९० मिली क्षमतेच्या Rocket देशी दारू संत्रा कंपनीच्या २३ बॉक्समधील एकूण २३०० निपा जप्त करण्यात आल्या. प्रत्येक बॉक्समध्ये १०० निपा असल्याचे नमूद असून, या मुद्देमालाची अवैध विक्री किंमत अंदाजे १ लाख ८४ हजार रुपये आहे.
तसेच ७५० मिली क्षमतेच्या Officer’s Choice कंपनीच्या ११ बॉक्समधील एकूण १३२ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. प्रत्येक बॉक्समध्ये १२ बाटल्या असून, या मुद्देमालाची अंदाजे अवैध विक्री किंमत १ लाख ३२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे तिन्ही प्रकारच्या दारूसाठ्याची एकूण किंमत ३ लाख ५२ हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूसाठ्याबाबत संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा संपत पोचा आईलवार याचा असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी दिवाकर बाना गावडे, वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कोलपल्ली आणि संपत पोचा आईलवार, वय ४२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कोलपल्ली, या दोघांविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्याद पोलीस शिपाई निलेश लक्ष्मण दाने (ब.नं. ३६०२), नेमणूक पोलीस स्टेशन अहेरी यांनी दिली आहे. गुन्हा १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.२८ वाजता नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविष्कार गुंजाळ करीत आहेत.
अवैध दारूविक्रीविरोधात अहेरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात विनापरवाना दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
— विदर्भ न्यूज २४ नेटवर्क | अहेरी
