*नागपूर विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक 4 मार्च 2026
येत्या ६ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६- २०२७ या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सर्व सामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक उपयुक्त ठरणार असून सर्वांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्याच्या आर्थिक प्रगतीचे धोरण असणारा अर्थसंकल्प सर्व सामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक लिहिले. आजच्याच दिवशी (४ मार्च) २०२० मध्ये हे नागपूर येथील लाखे प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात ‘बजेट’ शब्दाच्या उत्पत्तीपासून अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी कोणत्या बाजू समजून घ्याव्यात हे सांगितले आहे. अर्थसंकल्प विषयक संज्ञा व त्यासाठी होणारे मराठी व इंग्रजी शब्द प्रयोग, काही महत्वाच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण, अर्थसंकल्पाविषयी भारतीय संविधानातील तरतुदी, अर्थसंकल्पाची रचना, अर्थसंकल्प तयार होण्याची प्रक्रिया, अर्थसंकल्पीय प्रकाशने, अर्थसंकल्पास मिळणारी मंजुरी या विषयांसह अर्थसंकल्प कसा वाचावा आणि समजून घ्यावा याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील पांढऱ्या रंगाचे मुख पृष्ठ असलेले अर्थसंकल्पीय अंदाज (व्हाईट बुक) हे प्रकाशन आणि यात सापडणारे ग्रीन बुक मधील अर्थसंकल्पीय तरतुदींचे विस्तृत विवरण सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले आहे. शासनाच्या विविध विभागनिहाय व विकास मंडळनिहाय अनिवार्य विकास खर्चाची माहिती तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) (ब) नुसार प्रादेशिक अनुशेष निर्मुलनासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार शासनाने सादर करायचा अनुपालन आदेश. यासह अर्थसंकल्प सादर करणे, मंजूर करणे त्याचे कायद्यात रुपांतर होणे आणि शासनास राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यास परवानगी मिळणे आदी टप्पे या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.
*येथे वाचता येणार पुस्तक*
अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक https://www.devendrafadnavis.in/budget_2020
या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध असून त्यातून अर्थसंकल्प समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाने प्रसिद्धीस दिले आहे
0000000
