आष्टी (प्रतिनिधी) दिनांक:-07 एप्रिल 2026
आष्टी–चंद्रपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने मात्र थोडक्यात जीव वाचवला आहे. मात्र आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास धानापूर येथील जिनिंगजवळ घडली.
गौतम सुरेश निमसरकर (वय ३६) व वैशाली गौतम निमसरकर (वय ३०, रा. अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. तर सिया गौतम निमसरकर (वय ६) ही चिमुकली या अपघातातून बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम निमसरकर हे आपल्या दुचाकी (क्र. MH 33 AB 0659) वरून पत्नी व मुलीसह काही कामानिमित्त चंद्रपूर येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना धानापूर येथील जिनिंगजवळ मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या वैशाली यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातावेळी सिया ही दुचाकीवरून दूर फेकली गेली, मात्र नशीब बलवत्तर असल्याने ती गंभीर जखमी होण्यापासून बचावली. मात्र आपल्या डोळ्यांसमोर आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने तिने एकच हंबरडा फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.
गौतम निमसरकर हे मनमिळावू स्वभावाचे असून अनखोडा ग्रामपंचायतीत संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. सुखी संसार सुरू असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण अनखोडा गावावर शोककळा पसरली आहे.
