सिरोंचा/गडचिरोली,प्रतिनिधी दिनांक 31 जुलै 2026
सलग सुमारे ४० तास अंधारात राहिलेल्या सिरोंचा तालुक्यात अखेर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण आणि पारेषण विभागाला यश आले. मात्र, वीज संकटातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असतानाच अतिवृष्टीमुळे आता पुराचे संकट अधिक गडद झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २५ प्रमुख रस्ते आणि मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीमुळे जंगल परिसरातील उंच वृक्ष उन्मळून पडल्याने ६६ केव्ही आलापल्ली–सिरोंचा वीजवाहिनीवर गंभीर बिघाड झाला होता. या वृक्षांमुळे वीजवाहिनीवरील कंडक्टर तुटल्याने संपूर्ण सिरोंचा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर महावितरण व पारेषण विभागाच्या पथकांनी प्रतिकूल हवामानातही युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली.
जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा यांनी रात्री उशिरापर्यंत परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिघाड झालेल्या चारपैकी तीन ठिकाणचे काम पूर्ण करण्यात आले होते, तर चौथ्या ठिकाणी सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर अखेर सुमारे ४० तासांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
वीजपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी या कालावधीत संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा, पाणीपुरवठा, व्यापारी व्यवहार, शासकीय कार्यालयांचे कामकाज तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर मोठा परिणाम झाला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील २५ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
यामध्ये आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी (मोसम नाला), आष्टी–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी), एटापल्ली–गट्टा मार्ग, मुलचेरा–आलापल्ली मार्ग, अहेरी–देवलमारी, धानोरा–रांगी, रोमपल्ली–झिंगानूर (सिरोंचा), ताडगाव–दामरंचा, घोट–रेगडी, कुरुड–वडसा यांसह अनेक महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.
विशेषतः रोमपल्ली–झिंगानूर मार्ग बंद झाल्याने सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क प्रभावित झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, पाण्याखाली गेलेल्या पूल किंवा रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न न करण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाला असला तरी पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
