गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक: 9 सप्टेंबर 2026
अहेरी तालुक्यातील कवराम येथे नियमित लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची AEFI (Adverse Event Following Immunization) म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, लसीकरणामुळेच बालकाचा मृत्यू झाला, असा कोणताही निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कवराम येथील श्रीमती सुनिता शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बालकाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत आयोजित नियमित लसीकरण सत्रात लसीचे डोस देण्यात आले होते. लसीकरणानंतर बालकाची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली. बालकाच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय AEFI चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमार्फत घटनेच्या विविध पैलूंची तपासणी केली जात आहे.
चौकशीदरम्यान संबंधित लसीकरण केंद्रातील लसींची साठवणूक, शीतसाखळी (Cold Chain) व्यवस्था, वापरण्यात आलेल्या लसीची बॅच, लसीकरणाची प्रक्रिया, लसीकरणानंतरची परिस्थिती तसेच बालकाची वैद्यकीय पार्श्वभूमी यांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे केवळ लसीकरणानंतर मृत्यू झाला म्हणून त्याचा थेट संबंध लसीशी जोडणे योग्य ठरणार नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार असून, त्यासोबतच AEFI समितीच्या सखोल चौकशीचा अंतिम अहवाल विचारात घेतला जाणार आहे. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील वैद्यकीय कारण आणि लसीकरणाशी त्याचा काही कारणात्मक संबंध आहे अथवा नाही, याबाबत स्पष्टता येणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढू नये आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यावर भर दिला जात आहे. घटना गंभीर असली तरी सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी वैज्ञानिक तपासणी आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
विदर्भ न्यूज 24 चा विशेष भर :
बालकाच्या मृत्यूची घटना निश्चितच दुर्दैवी आहे. मात्र, लसीकरण आणि मृत्यू यांच्यातील संबंधाबाबत अधिकृत चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. शवविच्छेदन आणि AEFI समितीचा अंतिम अहवालच या प्रकरणातील सत्य परिस्थिती स्पष्ट करणार आहे.
