गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 9 सप्टेंबर 2026
चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली शिवारात रस्त्यालगत आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. अत्यंत क्लिष्ट आणि सुरुवातीला मृतकाची ओळखही पटत नसलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत छडा लावत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती, कुटुंबीय व साक्षीदारांकडून मिळालेली माहिती तसेच शेजारील जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणेशी साधलेला समन्वय या आधारे पोलिसांनी या खुनाचा तपास पुढे नेला.
मौजा वाघोली, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील शिवारात चामोर्शी ते मूल जाणाऱ्या रस्त्यालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.०३ वाजता पोलीस स्टेशन चामोर्शी येथे अपराध क्रमांक ०४६२/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतदेहाजवळ मृतकाची ओळख पटविण्यासाठी कोणतीही ठोस वस्तू किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याने प्रथम मृतकाची ओळख पटविणे हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतकाच्या अंगावर ओळख पटविण्यासाठी कोणतीही वस्तू आढळून आली नसल्याने पोलिसांनी विविध माध्यमांतून मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. सहायक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. तसेच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी चामोर्शी पोलीस स्टेशन येथे तपासाचा आढावा घेत तपास पथकांना आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर गडचिरोली पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांतील पोलीस दलाशी समन्वय साधत तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. विविध दिशांनी केलेल्या तपासातून अखेर मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतकाचे नाव नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी, वय ३३ वर्षे, रा. मूल, जिल्हा चंद्रपूर असे असल्याचे निष्पन्न झाले.
मृतकाची ओळख पटताच तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली. पोलिसांनी मृतकाचे कुटुंबीय, साक्षीदार आणि उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. संशयित व्यक्तींची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणात दोन अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानुसार दोन्ही संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकांना तपासासाठी बोलावून त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केली. चौकशीदरम्यान या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृतक नंदकिशोर मिश्रा ऊर्फ बंटी याच्याकडे अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती या दोन्ही अल्पवयीन बालकांना होती. त्यानुसार दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी दोन्ही बालक आणि मृतक असे तिघे घटनास्थळी गेले होते. तेथे तिघांनी अंमली पदार्थ तसेच मद्याचे सेवन केल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर नशेच्या अवस्थेत तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे भांडणात रूपांतर झाले. त्यावेळी दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना नंदकिशोर मिश्रा याचा तीव्र राग आल्याने त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. दगड तसेच मोटारसायकलमध्ये असलेल्या टी-रॉडने नंदकिशोर यांच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन नंदकिशोर मिश्रा यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दोन्ही बालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला मृतकाची ओळखही पटलेली नव्हती आणि घटनास्थळी तपासाला मदत करणारे ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पुढे नेत मृतकाची ओळख पटवली आणि त्यानंतर गुन्ह्यातील संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मा. बाल न्याय मंडळ, गडचिरोली यांच्या समक्ष हजर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन चामोर्शीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बन्सोडे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईमध्ये चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बन्सोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, पोलीस उपनिरीक्षक शाही दंडे तसेच पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
