गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 08 जुलै 2026
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामामुळे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोकादायक परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीवर ७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तात्पुरता प्रतिबंध घातला आहे. या निर्णयामुळे बांधकामास गती मिळण्यासोबतच अपघातांचा धोका कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य मिळणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. पावसाळ्यात रस्त्याची झालेली अवस्था, सुरू असलेले बांधकाम आणि जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे उद्भवू शकणारे अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. प्रवासी बस, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने, पाणीपुरवठा, अन्नधान्य व औषध पुरवठा करणारी वाहने, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या यंत्रणा आणि वाहनांना या बंदीमधून सूट देण्यात आली आहे.
जड वाहनचालकांनी सिरोंचा–मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली तसेच आलापल्ली–आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. संबंधित वाहतूकदार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आणि संबंधितांवर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे जड वाहनधारकांनी प्रतिबंधित कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिरोंचा–आलापल्ली हा गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या मार्गावरील महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे आणि पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
— VIDARBHA NEWS 24 NETWORK
“विदर्भाची शान • गडचिरोलीचा मान”
