सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 26 मे 2026
टेकडाताल्ला–कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी घडामोड घडली. आंदोलनाची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी घेत आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून थेट संवाद साधला. “मी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन संबंधित विभागाला काम सुरू करण्याचे आदेश देणार आहे,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सिरोंचा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील जवळपास ३० गावांतील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मागील दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या पुलामुळे पावसाळ्यात संपूर्ण परिसर संपर्कबाह्य होण्याची भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांची गैरसोय तसेच दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान, आंदोलनाची बातमी News18 मराठी वर झळकल्यानंतर राज्यभर या प्रश्नाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलनस्थळी एकच जल्लोष पाहायला मिळाला.
या संपूर्ण घडामोडीत ज्येष्ठ पत्रकार Mahesh Tiwari यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा परिसरात होत आहे. आंदोलनकर्ते आणि शासन यांच्यात संवाद घडवून आणण्यात त्यांचे प्रयत्न निर्णायक ठरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्ही अतिदुर्गम भागातील लोक आहोत. आमच्या समस्या ऐकून थेट फोनवर बोलणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. आमच्यासारख्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याची त्यांची भूमिका आम्हाला आश्वस्त करणारी आहे. त्यांनी आमच्याशी थेट संवाद साधला, हे आमच्या भागाचे भाग्य आहे,” अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच “जर राज्याला असेच संवेदनशील आणि तळागाळातील लोकांचा विचार करणारे नेतृत्व मिळत राहिले, तर दुर्गम भाग विकासापासून वंचित राहणार नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले, तरी आता प्रत्यक्षात पुलाचे काम किती वेगाने सुरू होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता
मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधून पुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळत असलेले नायब तहसीलदार हलामी साहेब, निवासी नायब तहसीलदार सिडाम साहेब, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा सचिव संदीप राचर्लावार तसेच व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवि चकिनारापुवर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
