सिरोंचा (गडचिरोली) विशेष प्रतिनिधी दिनांक 29 मे 2026
सिरोंचा तालुक्यातील रायगुडम येथील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तेंदूपत्ता पडीवर बोध भराईचे काम करणाऱ्या मजुरांवर अचानक आकाशीय वीज कोसळल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून तेंदूपत्ता संकलन व्यवस्थेतील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगुडम गावालगतच्या इंद्रावती नदीकाठावरील रेती परिसरात तेंदूपत्ता पडीवर बोध भराईचे काम सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून आणण्यात आलेले अनेक मजूर त्या ठिकाणी कामात व्यस्त होते. दरम्यान सायंकाळी सुमारे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच आकाशीय वीज कोसळली आणि कामावर असलेले मजूर तिच्या तडाख्यात सापडले.
वीज कोसळण्याची तीव्रता इतकी भीषण होती की एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जगदीश मांदाळे (वय ४४) आणि कोमल दिलीप मांदाळे हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी बीजापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या दोघांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेला व जखमी झालेले मजूर हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या वेळी पातागुडमचे माजी उपसरपंच मल्लेश दुर्गम हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनाही विजेचा सौम्य झटका बसला असला तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गेला मजुराचा जीव?
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तेंदूपत्ता ठेकेदार संगीता मनोज जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातून आणलेल्या मजुरांसाठी सुरक्षित निवास, तात्पुरते निवारा शेड, पावसाळी वातावरणात संरक्षण किंवा आपत्कालीन सुविधा यापैकी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
मजूर इंद्रावती नदीच्या खुल्या रेती परिसरात राहत व काम करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. खराब हवामानाचा अंदाज असतानाही मजुरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळेच एका गरीब मजुराला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृत मजुराच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व जखमी मजुरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने उचलावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
स्थानिक आदिवासी मजुरांमध्ये संताप
या घटनेनंतर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पेंडलया, पातागुडम आणि रायगुडम परिसरातील स्थानिक आदिवासी मजुरांना यंदाच्या तेंदूपत्ता हंगामात काम देण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, रोजगाराची संधी उपलब्ध असूनही बाहेरील मजूर आणण्यात आले. त्यामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. एका बाजूला स्थानिकांना काम नाकारले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला बाहेरून आणलेल्या मजुरांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून घटनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. आकाशीय वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. तसेच मजुरांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.
रायगुडम येथील ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून मजुरांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे गंभीर उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि मृत मजुराच्या कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण सिरोंचा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
