सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-15 जुलै 2026
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सिरोंचा पोलीस स्टेशन येथे प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजना अंतर्गत भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेती, शासकीय कृषी योजना आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती या मेळाव्यात देण्यात आली.
हा मेळावा पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक तसेच अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील होते, तर पोलीस स्टेशन सिरोंचाचे प्रभारी अधिकारी मारुती नंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय कृषी अधिकारी तांबे, जिल्हा परिषद शाळा सिरोंचा येथील जगदाबे सर, विद्यार्थी, पोलीस पाटील, जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, एसआरपीएफचे जवान तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारक शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
मेळाव्यादरम्यान शेतकरी व नागरिकांना विविध उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये २५ साड्या, २० मच्छरदाण्या, १० टी-शर्ट, २० धोतर, २० स्कूल बॅग, १० छत्र्या, २० जोड चप्पल, १५ प्लास्टिक घमेले, १ व्हॉलीबॉल, १ व्हॉलीबॉल नेट, २ क्रिकेट बॅट, ६ क्रिकेट बॉल, ३ क्रिकेट स्टंप आणि ७० झाडांची रोपे यांचा समावेश होता.
या उपक्रमाला सुमारे १८० ते २०० नागरिक व शेतकरी उपस्थित होते. उपस्थित सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. कृषी मार्गदर्शनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत पोलीस प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी स्वागत केले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे प्रवृत्त करणे, शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणे, हा या कृषी मेळाव्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. हा उपक्रम शेतकरी हितासाठी आणि समाजाभिमुख पोलिसिंगचा आदर्श ठरणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
