सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 25 मे 2026
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम टेकडाताल्ला–कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील अर्धवट पुलाचे बांधकाम मागील दीड वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही संबंधित विभाग आणि कंत्राटदाराकडून कामाला कोणतीही गती देण्यात आलेली नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
सदर पुलाच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली; मात्र काही अंशी काम करून कंत्राटदाराने काम बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी आजही पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेतच पडून आहे.
या पुलावर टेकडाताल्ला, कंबालपेठा चंक, पुसुकपल्ली, गोट्टेगुडम, नेमडा, जाफ्राबाद, मोकेला, चिक्याला, parasewada, येल्ला, रामन्नापेठा, पापयपल्ली, नरसिंहापल्ली, मुलदिम्मा, कोत्तूर, रेगुंठा, कोठापल्ली, मोयाबिनपेठा, बोगुटागुडम, दर्शवाडा, विठ्ठलरपेठा, ओड्डुगुडम, पिरमेडा, चंदाराम, बोंडा, पैडिगुंडम आदी जवळपास 30 गावांतील नागरिकांचे दळणवळण अवलंबून आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळ्यात अट्टीवागू नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येतो. त्यामुळे पुलाअभावी या गावांचा संपर्क थेट तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी तुटतो. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, तर गंभीर आजारी रुग्णांना वेळेत उपचारासाठी हलवणे अशक्य होते. अनेकदा जीव धोक्यात घालून नागरिकांना नाला पार करावा लागतो.
विशेष म्हणजे या प्रश्नावर यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली होती. वृत्तपत्रांतून वारंवार बातम्याही प्रकाशित झाल्या; मात्र प्रशासन आणि संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास तीन प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. त्यामध्ये सात दिवसांच्या आत पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे लेखी आदेश द्यावेत, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच कामातील विलंबाची सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी आंदोलनस्थळी सरपंच स्वामी गोदारी, रामकृष्णू नीलम, सुधाकर पेद्दी, संतोष कुमार आंबिलपु, श्रीनिवास ओल्लाला, तिरुपती गादे, कोटा, महेंद्र दुर्गम, सत्यनारायण परपटलावार, मधुकर मडावी, पोलमपल्ली राजबाबू, बंडू गावडे आदींसह 30 गावांतील शेकडो नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, “आता पावसाळ्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करावे किंवा पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी. अन्यथा यंदाही 30 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
सिरोंचा तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या तंबूमुळे परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
— विदर्भ न्यूज 24
