गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:- 23 मे 2026
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी मोहिमेला आणखी मोठे यश मिळाले असून, जंगल परिसरात गुप्तपणे उभारण्यात आलेला माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
माओवादी संघटना सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी जंगल परिसरात स्फोटके, शस्त्रनिर्मिती साहित्य व इतर उपकरणे गुप्तपणे जमिनीत पुरून ठेवत असल्याची माहिती यापूर्वी अनेकदा समोर आली होती. निवडणुका, नक्षल सप्ताह किंवा सुरक्षा दलांच्या हालचालीदरम्यान मोठे हल्ले घडवून आणण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी सातत्याने राबविलेल्या आक्रमक मोहिमांमुळे माओवादी चळवळ कमकुवत होत असून आता जंगलात लपवून ठेवलेले साहित्यही शोधून नष्ट करण्यात येत आहे.
सविस्तर माहितीनुसार, “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत 16 मे 2026 रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या काही माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मितीशी संबंधित साहित्य लपवून ठेवले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली.
या माहितीच्या आधारे 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिता आणि बीडीडीएसच्या संयुक्त पथकांना शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले. या मोहिमेत विशेष अभियान पथकाच्या सहा तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या दोन तुकड्यांचा समावेश होता.
22 मे रोजी पोमकें-बिनागुंडाच्या उत्तरेकडील घनदाट जंगल परिसरात जवानांनी घेरा घालत कसून तपासणी केली. यावेळी जमिनीत लपवून ठेवण्यात आलेले मोठ्या प्रमाणावरील साहित्य हस्तगत करण्यात आले. यात लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटऱ्या, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल तसेच सुमारे 20 फुटांचे फुटबॉल पाईप आदी साहित्याचा समावेश होता.
हे साहित्य शस्त्रनिर्मिती, दुरुस्ती तसेच विविध घातपाताच्या कारवायांसाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी हे साहित्य अत्यंत गुप्तपणे जंगलात पुरून ठेवले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच संपूर्ण साहित्य नष्ट करण्यात आले. यामुळे भविष्यातील संभाव्य घातपाताचा मोठा डाव उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांनी अत्यंत धाडसाने व समन्वयाने ही मोहीम यशस्वी केली.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी मोहिमेत सहभागी सर्व जवानांचे विशेष कौतुक केले असून, गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.
