आलापल्ली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 23 जुलै 2026
गडचिरोली जिल्ह्याला तेलंगणा व छत्तीसगड राज्यांशी जोडणारा आणि जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक तसेच औद्योगिक विकासाची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (NH-353C) गेल्या तब्बल सहा वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे आजही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, सातत्याने होणारा विलंब, कथित भ्रष्टाचार, अपूर्ण पूल, खड्डेमय रस्ता आणि धुळीच्या साम्राज्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. अनेक वेळा आंदोलने, निवेदने, लोकप्रतिनिधींचे पाठपुरावे आणि माध्यमांनी सातत्याने आवाज उठवूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांनी गुरुवारी आलापल्ली–सिरोंचा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांची थेट भेट घेत महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कठोर शब्दांत जाब विचारला.
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना संतोषभाऊ ताटीकोंडावार म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून या महामार्गाच्या कामामध्ये सातत्याने अनियमितता सुरू आहे. नागरिकांना वारंवार आश्वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, अर्धवट सोडलेली कामे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि कामाच्या संथ गतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी त्यांनी ठाम मागणी केली.
पाहणीदरम्यान एक बाब विशेष चर्चेचा विषय ठरली. महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे पाहणीसाठी तेलंगणा राज्यातून आले असल्याचे समजताच संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले, “साहेब, तुम्ही फक्त पाहणीसाठी तेलंगणातून एकदा येता. पण आम्ही या रस्त्यावरून रोज जीव मुठीत धरून प्रवास करतो. या रस्त्याची खरी वेदना आम्हालाच माहिती आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे लोट आणि वर्षभर खड्ड्यांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे केवळ पाहणी करून परत जाण्यापेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यावर भर द्या.”
यावेळी उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. अनेक वेळा बससेवाही विस्कळीत होते. गर्भवती महिला, गंभीर रुग्ण आणि अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे अत्यंत अवघड बनले आहे. रुग्णवाहिका अनेकदा चिखलात अडकतात किंवा खराब रस्त्यामुळे विलंब होतो. व्यापाऱ्यांना मालवाहतुकीत मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवताना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वाहनांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत असून अनेक अपघातही या रस्त्यावर घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारला की, “हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?” या प्रश्नाने उपस्थितांमध्येही संतापाची भावना व्यक्त झाली.
चर्चेनंतर अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी महामार्गाचे रखडलेले काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, कामाचा दर्जा सुधारला जाईल आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र गेल्या सहा वर्षांपासून अशाच प्रकारची आश्वासने सातत्याने मिळत असल्याने स्थानिक नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास जवळपास संपुष्टात आला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर लवकरात लवकर आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही, दोषींवर कठोर कारवाई झाली नाही आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ गडचिरोली जिल्ह्याचा रस्ता नसून महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी, शेतकरी तसेच औद्योगिक वाहने प्रवास करतात. मात्र सहा वर्षांपासून सुरू असलेल्या रखडलेल्या कामामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासालाच मोठा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता नागरिकांची एकच मागणी आहे—आश्वासनांची नव्हे, तर दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालेल्या राष्ट्रीय महामार्गाची.
