सिरोंचा प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 24 जुलै 2026
सिरोंचा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, पेंटीपाका येथील प्रलंबित धान खरेदी तात्काळ सुरू करावी, धान खरेदीस मुदतवाढ द्यावी आणि अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी पेंटीपाका बसस्टँडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे दीड ते दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पेंटीपाका धान खरेदी केंद्रात अनेक शेतकऱ्यांचे धान अद्यापही खरेदी न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी किसान आघाडीच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या देत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “धान खरेदी सुरू करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “आमच्या घामाची किंमत द्या” अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. कोणत्याही वाहनाला पुढे किंवा मागे जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधींना घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शासन स्तरावर धान खरेदीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून अडकलेली वाहने मार्गस्थ केली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी मारुती नंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता आंदोलन संपल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या आंदोलनात किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष मधुसूदन अरवेल्ली, किरण वेमूला, वेमूला पटेल, राजू रंगूवार, सत्यम गोरा यांच्यासह पेंटीपाका व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत शासनाने तातडीने धान खरेदी सुरू करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
धान खरेदीच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाला घटनास्थळी धाव घ्यावी लागली. आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याकडे संपूर्ण सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
