मुंबई, विशेष तिनिधी दिनांक :-8 मार्च 2025
महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कठोर कायदे अंमलात आणत असून, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महिलांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, महिलांच्या सुरक्षेसाठी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनानिमित्त आयोजित विशेष संवादात दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन महिलांच्या सशक्तीकरणाविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.
महिला आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने
महिला पत्रकार आणि माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 24 तास जागरूक राहून कार्य करणाऱ्या या महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महिला उद्योजकतेला चालना
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने विविध क्लस्टर्समध्ये विशेष संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10,000 महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. भविष्यातील नोकऱ्या AI क्षेत्रात असतील, त्यामुळे महिलांनी त्यात आघाडीवर राहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातील महामार्गांवर दर 50 किमी अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या देखभालीसाठीही ठोस योजना आखली जात आहे.
लैंगिक समानता आणि महिलांचा सन्मान
स्त्री-पुरुष समानतेची जाणीव शालेय वयापासून मुलांमध्ये रुजवली पाहिजे. महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची जबाबदारी केवळ कुटुंबांची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांना सातत्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागते, ही बाब चिंताजनक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
लव्ह जिहादविरोधात कठोर पावले
लव्ह जिहाद हा काही अपवादात्मक प्रकार नाही, तर मोठ्या प्रमाणावर चाललेला संगठित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कठोर कारवाईसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या वेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे आणि दयानंद कांबळे उपस्थित होते.