गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-11/03/2025
शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती, गडचिरोली येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांमुळे समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी मदतीचा हात मिळतो. मात्र, या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनातील महत्त्वाच्या योजना
या प्रदर्शनात शिष्यवृत्ती योजना, रोजगार व स्वयंरोजगार योजना, दिव्यांग कल्याण योजना, रमाई आवास योजना, स्वाधार योजना, कृषी स्वावलंबन योजना, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम अशा विविध योजनांची माहिती सविस्तर देण्यात आली आहे. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेत सुधारणा करत विहिरीसाठी ४ लाखांपर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच, अनुसूचित जमातींसाठी अशाच प्रकारच्या विविध योजना उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, गरजूंपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे आवश्यक असून, हे कार्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून साध्य होत आहे. शिक्षण, विदेशातील उच्च शिक्षणासाठी सहाय्य, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार यांसारख्या योजनांची माहिती येथे उपलब्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी आभार मानले.
हे प्रदर्शन १२ मार्चपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, नागरिकांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.