सिरोंचा: विशेष प्रतिनिधी दिनांक:-11/03/2025
तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असून, शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. झिंगानूर, नरसिंहपल्ली, कोटापल्ली यांसारख्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर असून, जलजीवन मिशन अंतर्गत इमारती उभारल्या, सोलर प्लेट बसवण्यात आल्या, पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, मात्र अद्यापही नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही.
मागील वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी झिंगानूर गावाला भेट देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी योजना राबविल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात नळाला पाणी आलेले नाही. अनेक ठिकाणी पाइपलाइन आणि चेंबरचे काम अपूर्ण असून, उघड्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला असला, तरी प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
उन्हाळ्यात संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील झिंगानूरसारख्या भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.