गडचिरोली विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक:-12/03/2025
भामरागड येथील जिल्हा परिषद समुह निवासी शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भामरागड पोलिसांनी मुख्याध्यापक मालु नोगो विडपी (वय ५०) यास अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वार्डनच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
शाळेतील वस्तीगृहाच्या वार्डनने विद्यार्थिनींना ‘गुड टच – बॅड टच’ विषयी मार्गदर्शन केले असता काही विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाच्या अश्लील कृत्यांबाबत माहिती दिली. वार्डनने त्यांच्या पालकांना याबाबत सांगताच त्यांनी तातडीने भामरागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जुलै २०२४ पासून सुरू होते अत्याचार
तपासादरम्यान, मुख्याध्यापक जुलै २०२४ पासून विद्यार्थिनींना एकट्याने शाळेच्या छतावर, कार्यालयात बोलावून अश्लील कृत्य करत असल्याचे उघड झाले. तसेच, हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारहाण, बलात्काराची धमकी तसेच शाळेतून काढून टाकण्याचा इशारा देत असल्याचे पीडितांनी सांगितले.
पोलीस कोठडी सुनावली
या तक्रारीवरून भामरागड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७५(२), ३५१(२) (३) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. ११ मार्च रोजी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गडचिरोली पोलिसांचे कठोर पाऊल
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, एम. व्ही. सत्यसाई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले की, “अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलिस दल पूर्ण प्रयत्न करेल.”