गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी दिनांक :-12 मार्च 2025
सायबर गुन्हे आणि इंटरनेट फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅन उपक्रम सुरू केला आहे. या व्हॅनचे अनावरण अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य डॉ. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये इंटरनेट आणि सायबर सुरक्षेविषयी पुरेशी माहिती नसल्याने अनेक नागरिक ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मोबाईलवर कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीत डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन गेमिंग घोटाळे, बनावट सरकारी योजनांच्या नावाने फसवणूक आणि व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे पैसे उकळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना सायबर सुरक्षेविषयी जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही मोबाईल व्हॅन गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, चौक, बसस्थानके यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन ऑडिओ-व्हिडिओ माध्यमांतून, तसेच पोस्टर आणि बॅनरच्या साहाय्याने माहिती देईल. नागरिकांना सायबर सुरक्षेची शपथही दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाला पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. व्ही. सत्यसाई कार्तिक यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मोबाईल व इंटरनेट वापरात सतर्कता बाळगा. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे तक्रार नोंदवा.”