नवी दिल्ली, दिनांक:-13 मार्च 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्याला माईनिंग हब म्हणून विकसित करणे, नागपूर विमानतळाच्या विकासाला गती देणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकर मिळावा यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये स्टील सिटी म्हणून मोठी प्रगती होत असून, त्याला केंद्र सरकारकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी केली. नागपूर विमानतळाच्या कामातील अडचणी लवकर दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटसाठी महाराष्ट्राला संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. या निमित्ताने आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.