गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी दिनांक:–15/03/2025
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने जंगलात पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी शोधून नष्ट केले. या कारवाईत स्फोटकांसह एक भरमार बंदूक जप्त करण्यात आली आहे.
भामरागड उपविभागातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे येथे विशेष अभियान पथक गस्त घालत असताना, पोस्टे कवंडेपासून केवळ 100 मीटर अंतरावर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक जवानांच्या निदर्शनास आली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बीडीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड) पथकाला पाचारण करून परिसराची तपासणी करण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान, झुडपांजवळील जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोलीवर लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी आढळून आली. तपासणीअंती त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर स्फोटक साहित्य घटनास्थळीच नष्ट केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्यसाई कार्तिक, आणि भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी पार पाडली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या यशस्वी कारवाईबद्दल जवानांचे कौतुक केले असून, माओवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
फ्लॅश न्यूज
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई: माओवाद्यांचे स्फोटक साहित्य नष्ट
पोस्टे कवंडेपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर स्फोटक साहित्याचा साठा उघडकीस
स्फोटकांसह एक भरमार बंदूक जप्त
माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला