छत्तीसगड विशेष प्रतिनिधी दिनांक:-21/03/2025
गडचिरोलीच्या सीमेलगत छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यांत गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत तब्बल 30 नक्षलवादी ठार झाले. गेल्या चार महिन्यांपासून सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियानात आक्रमक पवित्रा घेतल्याने नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मोठा आळा बसला आहे. मागील दीड महिन्यात विविध कारवायांमध्ये 100 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सुरक्षा दलांची रणनीती प्रभावी
गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील नक्षलविरोधी धोरणाला नवे बळ मिळाले आहे. गडचिरोली सीमावर्ती भागात गेल्या दोन वर्षांत 5 नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे नक्षलवादी हालचालींवर मोठा आळा बसला आहे.
नक्षल नियंत्रणासाठी आक्रमक मोहीम
सुकमा, दंतेवाडा, बस्तर आणि नारायणपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत सुरक्षायंत्रणेने सततच्या मोहिमा राबवून नक्षलवाद्यांचे नेटवर्क तोडण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. दुपारपर्यंत 22 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत झाले होते, तर संध्याकाळपर्यंत हा आकडा 30 वर पोहोचला.
सुरक्षा दलांचा आक्रमक पवित्रा यशस्वी
नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि शस्त्रसाठा असलेल्या भागात सुरक्षा दलांनी सातत्याने दबाव वाढवला आहे. त्यामुळे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर माघार घेत असल्याचे दिसत आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर, कांकेर, सुकमा आणि दंतेवाडा भागांत विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. या कारवायांनी नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.