सिरोंचा, तालुका प्रतिनिधी 06 एप्रिल 2025
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सिरोंचा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातील एकता चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आणि तालुका अध्यक्ष निवड प्रक्रियेचे निरीक्षक डॉ. नामदेव उसंडी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रध्वज फडकवून उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपा पक्षाच्या स्थापनेचे व पक्षाच्या कार्यपद्धतीचे महत्व पटवून दिले.
ध्वजारोहणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. उसंडी यांनी भाजपा पक्षाची कार्यशैली, संघटनात्मक बांधणी, आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले की, पक्षाचे बळ हे कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच वाढते, आणि प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेशी बांधील राहून कार्य करणे गरजेचे आहे.
यानंतर माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी व ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी भुरसे यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेसाठी बैठक घेण्यात आली. निरीक्षक डॉ. उसंडी यांनी या प्रक्रियेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बंद खोलीत एक एक एक जन येऊन त्यांना आपापल्या पसंतीची तीन नावे सूचवण्याचे आवाहन केले
या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व तीन संभाव्य उमेदवारांची नावे निरीक्षकांना सूचित करण्यात आली. ही नावे पुढील निर्णयासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत स्थानिक यांनी केले.