सिरोंचा (ता.प्रतिनिधी) दिनांक:-05/04/2025
महसूल विभागाच्या वतीने १०० दिवसांच्या “कृती राजा” अभियानांतर्गत एक महत्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे, ज्याचे नाव आहे “जिवंत सातबारा”. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे गाव नमुना ७/१२ वर नोंद असलेल्या मयत खातेदारांची वारस नोंदी अद्ययावत करणे आणि त्यानुसार ७/१२ वर सर्व जिवंत खातेदारांची अचूक नोंद सुनिश्चित करणे.
सिरोंचा तालुक्यात दिनांक १ एप्रिल २०२५ पासून १० मे २०२५ पर्यंत ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार हे अधिकारी सक्रीय सहभाग घेत असून, गावोगावी चावडी वाचनाद्वारे मयत खातेदारांची माहिती संकलित केली जाणार आहे.
मोहिमेतील तीन प्रमुख टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:
1. (१ एप्रिल ते ५ एप्रिल): गावपातळीवर मयत खातेदारांची माहिती गोळा करणे, चावडी वाचन व गावनिहाय यादी तयार करणे.
2. (६ एप्रिल ते २० एप्रिल): मयत खातेदारांच्या वारसांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी व तपासणी – मृत्यू दाखला, वारस दाखला, वय, पत्ते, संपर्क क्रमांक व रहिवासी पुरावे. यानंतर स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांकडून खात्री व मंजुरी.
3. (२९ एप्रिल ते १० मे): ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार नोंदीची तयारी व सातबारा दुरुस्ती.
महसूल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या खातेदारांचे नाव ७/१२ वर असून ते मयत झाले आहेत, त्यांच्या वारसांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह पुढे यावे, जेणेकरून त्यांची नोंद अधिकृतरीत्या सातबाऱ्यावर होऊ शकेल.
जिवंत सातबारा – म्हणजे काय?
“जिवंत सातबारा” याचा अर्थ असा की, गावाच्या सातबारा उताऱ्यावर फक्त सध्याचे जिवंत खातेदारच नोंदलेले असावेत. यामुळे शेतजमिनीच्या मालकी हक्कात पारदर्शकता येते आणि भविष्यातील वादविवाद टाळता येतात.
तालुक्याचे तहसीलदार निलेश होनमोरे नायब तहसीलदार सय्यद व तोटावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही , मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून, या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.