चंद्रपूर, विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-14 एप्रिल 2025
समाजातील गरजूंना मदतीचा हात देताना केवळ राजकारणी नाही, तर माणूस म्हणून आपली भूमिका पार पाडणारे नेतृत्व विरळाच. चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार व राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्याच नेतृत्वाचे जिवंत उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या पुढाकाराने अवघ्या एका वर्षांच्या चिमुकल्या आराध्या वाघमारेला ऐकण्याची नवी संधी मिळाली आणि एका कुटुंबाच्या आयुष्यात नवचैतन्याचा सूर उमटला.
नेहरू नगर वार्डातील वाघमारे कुटुंबाच्या आराध्या हिच्या दोन्ही कानांचा ऐकण्याचा दोष डॉक्टरांनी लहानपणीच निदान केला. कॉक्लियर इम्प्लांटसारख्या क्लिष्ट व खर्चिक शस्त्रक्रियेसाठी घरच्यांना मार्ग सापडत नव्हता. याच वेळी आ. मुनगंटीवार यांच्या दारात त्यांनी आशेने टकटक केली आणि ती आशा विश्वासात व परिणामी यशात बदलली.
मुनगंटीवार यांनी संवेदनशीलतेने या प्रकरणाची दखल घेतली, मदतीचा हात दिला, तसेच तातडीने सहकार्याची साखळी उभी केली. टाटा ट्रस्टच्या मदतीने नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये झालेली यशस्वी शस्त्रक्रिया हे त्यांच्या प्रयत्नांचे फलित ठरले. आज आराध्या ऐकते आहे – हे केवळ वैद्यकीय यश नव्हे, तर माणुसकीच्या झऱ्याचा झुळूक आहे.
वाघमारे कुटुंबाच्या डोळ्यांतील कृतज्ञतेचे अश्रू, त्यांच्या मनातील भावना, आणि ‘आमदार मुनगंटीवार आमच्यासाठी देवदूत ठरले’ हे शब्द, त्यांच्या कार्याची पावती आहेत.
सामाजिक भान, मानवी संवेदना आणि सहकार्याची तयारी यामुळे सुधीर मुनगंटीवार हे केवळ एक नेते नाहीत, तर जनतेच्या मनात स्थान मिळवलेले एक खरे जनप्रतिनिधी आहेत.