अहेरी, तालुका प्रतिनिधी दिनांक:-.14 एप्रिल 2025
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोट्यवधींच्या निधीतून उभारलेली एकलव्य निवासी शाळा अहेरीत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यात थेट तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेनंतर अधीक्षकाने मुख्याध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच याच अधीक्षकाकडून एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाच हा नवा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा चेंडू थेट पोलीस विभागाच्या कोर्टात गेला आहे.
शाळा की सर्कस?
या शाळेची वाटचाल शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने न होता, सततच्या वाद, अपप्रवृत्ती आणि प्रशासनातील गोंधळाकडेच होत असल्याचे चित्र समोर येत आहे. महिन्याभरापूर्वी काही विद्यार्थ्यांनी शाळेतून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता आणि १० किमी अंतरावर सापडले होते. यापूर्वी एक महिला अधीक्षिकेने विद्यार्थिनींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही झालेला असून, ते प्रकरण अद्याप दडपण्यात आले आहे.
शासन गप्प का?
या साऱ्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व सुविधा वाढवण्याचे सरकारी दावे, तर दुसरीकडे शाळेतच सुरू असलेले वाद आणि गैरवर्तन – यात विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भवितव्य हेच दावणीला लागल्याचे चित्र आहे.
प्रशासन प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात?
या प्रकरणावर भारतीय जनता पार्टीचे अहेरी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनावर प्रकरण दडपण्याचा आरोपही लावला आहे,शाळा सावरणार की कोलमडणार – हा खरा प्रश्न आहे.