नागपूर विशेष प्रतिनिधी दिनांक:-18/04/2025
नागपूर शहरातील ग्रामीण व स्लम भागातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली.
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) यांचे अर्थसहाय्य आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशेष सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात, iBreastExam या अत्याधुनिक उपकरणाद्वारे ५ लाख महिलांची मोफत स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी विशेष मोबाईल क्लिनिक व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ मा. श्री. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच नागपूरमध्ये होणार आहे. यासाठी आमदार श्री. संदीप जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले असून, महिलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम एक मोठे पाऊल ठरणार आहे.
या प्रसंगी, रा.स्व.संघ नागपूर कार्यवाह उदयजी वानखेडे, संस्थेचे अध्यक्ष जयपाल ताकोते, डॉ. विशाखा निलावार, सौ. वंदना ताकोते, तांत्रिक सहाय्यक सौ. मंजूश्री चनने, तसेच डॉ. प्रीती मनमोडे, डॉ. मनीषा राजगीरे, देवयानी गोरडे, अशोकजी भूजोने व प्रकार मुतकुरे यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाद्वारे स्लम भागातील महिलांपर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचाराबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.