गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक:-19 एप्रिल2025
जिल्ह्यातील आधारभूत दरावर सुरू असलेल्या धान खरेदी योजनेचा मोठा गैरवापर उघडकीस आला असून, देऊळगाव येथील खरेदी केंद्रातून १००८४.०८ क्विंटल धानाचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये सचिव, संचालक मंडळातील सदस्य, तसेच काही अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
ही कारवाई नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशावरून झालेल्या साठा मोजणीच्या अहवालानंतर करण्यात आली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ६९/२०२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हे अपहार प्रकरण फक्त देऊळगावपुरते मर्यादित नसून, जिल्ह्यातील इतर खरेदी केंद्रांमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे उघड होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. लवकरच सर्व खरेदी केंद्रांची चौकशी होणार असून, आणखी काहींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
या गंभीर प्रकाराची माध्यमांतून माहिती समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रकरणाची दखल घेत कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते.प्रशासन आता संपूर्ण जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे समजते.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांचा अपहार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा प्रशासनाचा निर्धार आहे.
#RiceScam #Gadchiroli
#DeulgaonProcurementCenter #PaddyPurchaseIrregularities
#FarmersRights #FIRRegistered
#GrainScam #MSPPurchase
#DistrictAdministration #GadchiroliPolice
#ActionAgainstCorruption #FarmersFunds #CooperativeSociety