गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक :-20 एप्रिल 2025
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाचा तीव्र झटका नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखा
आरोग्य विभागानुसार, उष्माघाताची सामान्य लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, मळमळ, चक्कर, त्वचेवर लालसरपणा, आणि शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असणे यांचा समावेश होतो. लहान मुलांमध्ये चिडचिड, भूक मंदावणे, झटका येणे आणि डोळ्यांसमोर अंधुकपणा यासारखी लक्षणे दिसून येतात.
काळजी घेणे आवश्यक
उन्हाळ्यात घरात थंड वातावरण राखणे, हलक्या आणि सैल सूती कपड्यांचा वापर करणे, भरपूर पाणी पिणे, आणि गरज असल्यास टोपी, छत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. गरम अन्न, मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये टाळावीत, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे.
उष्माघात झाल्यास तातडीने उपाय
V. ज्यांना उष्माघात झाला आहे, त्यांना तातडीने सावलीत हलवावे, थंड पाण्याचा शेक द्यावा आणि शक्य असल्यास द्रवपदार्थ द्यावेत. बेशुद्धावस्थेत असलेली व्यक्ती दिसल्यास तातडीने १०८ किंवा १०२ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून गरजूंनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.