सिरोंचा (ता.प्र.) दिनांक 20 एप्रिल 2025 भारतीय जनता पक्षाच्या सिरोंचा तालुकाध्यक्षपदी श्रीनाथ राऊत यांची अधिकृत निवड करण्यात आली असून, ही घोषणा रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे करण्यात आली. या महत्त्वाच्या कार्यक्रमास तालुक्यातील व शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातील सर्व मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया याच दिवशी पार पडत होती. सिरोंचा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदिवे यांची नियुक्ती निवडणूक अधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक पद्धतीने ही निवड पार पडली.
या वेळी तालुकाध्यक्षपदासाठी श्रीनाथ राऊत यांच्या नावाची सुचना बूथ अध्यक्ष राजेश संतोषपू यांनी केली, तर नागेश ताडबोईना यांनी त्यास अनुमोदन दिले. अन्य कोणताही उमेदवार नसल्याने राऊत यांची बिनविरोध निवड झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना संबोधित करताना निवडणूक अधिकारी किसन नागदिवे यांनी भाजपच्या संघटनात्मक बळकटीचा आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “श्रीनाथ राऊत हे पक्षनिष्ठ, कार्यक्षम आणि संघटनात्मक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली सिरोंचा तालुक्यातील भाजप अधिक बळकट होईल.”
या कार्यक्रमात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर हजेरी लावून पक्षासाठी आपली निष्ठा आणि संघटनेप्रती असलेली बांधिलकी दाखवली. राऊत यांच्या निवडीने तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.