वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-05/08/2025 जिल्ह्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती गुगल शीटवर तात्काळ अद्ययावत करण्याचे तसेच, या कामासाठी नोडल अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
नियोजन भवनात आयोजित बैठकीत वृक्ष लागवडीचा आढावा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज घेतला.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. चालू वर्षी ४० लाख वृक्ष लागवड केली जात असून, पुढील वर्षीसाठी ६० लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे.
लागवड केलेल्या वृक्षांचे जतन आणि देखरेख करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, वृक्षांची पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी लागणाऱ्या ६० लाख रोपांची सध्याच्या रोपवाटिकांमधील तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक श्री गोकूल, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे तसेच सर्व जिल्हा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.