# नक्षलग्रस्त गडचिरोलीतील शौर्याला राष्ट्रपतींचा सलाम मौजा हेमलकसा–कारमपल्ली चकमकीतील धैर्यगाथेसाठी ७ जवानांना ‘पोलीस शौर्य पदक’…. – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाविशेष वृतान्त

नक्षलग्रस्त गडचिरोलीतील शौर्याला राष्ट्रपतींचा सलाम मौजा हेमलकसा–कारमपल्ली चकमकीतील धैर्यगाथेसाठी ७ जवानांना ‘पोलीस शौर्य पदक’….

Amazon.in/ONLINE SHOPPING

गडचिरोली (विदर्भ न्यूज 24) दिनांक 14 ऑगस्ट 2025

नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या रणांगणात कार्यरत असलेल्या पोलीस दलाने पुन्हा एकदा आपले शौर्य सिद्ध केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी महामहीम राष्ट्रपतींकडून गडचिरोली पोलीस दलातील सात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले. देशभरातील निवडक जवानांना दिल्या जाणाऱ्या या सन्मानात यंदा महाराष्ट्रातील सर्वच पदके गडचिरोली जिल्ह्याच्या नावावर जमा झाली आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

 हा सन्मान 2017 साली मौजा हेमलकसा–कारमपल्ली रस्त्यावर झालेल्या भीषण नक्षलवादी चकमकीदरम्यान दाखवलेल्या अद्वितीय शौर्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. त्या दिवशी सी–60 पथकाचे जवान कोठी येथील पोस्टवरून एमपीव्ही वाहनांतून भामरागडला परतत असताना माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत अचानक हल्ला चढवला. विस्फोटाच्या तीव्र धक्क्याने वाहनांचे नुकसान झाले, काही जवान जखमी झाले आणि काहीजण अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळी माओवाद्यांकडून प्रखर गोळीबार सुरू झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, जीवाची पर्वा न करता, जवानांनी आपल्या जखमी सहकाऱ्यांचे व स्वतःचे प्राण वाचवत शत्रूच्या गोळीबाराला तोंड दिले. त्यांनी विवेकबुद्धी, शौर्य आणि चपळाई यांचा अद्भुत संगम दाखवत माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही कारवाई केवळ बचावापुरती मर्यादित न राहता, जवानांनी माघार न घेता शत्रूचा सामना करत परिस्थिती आपल्या बाजूने वळवली. याच धैर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत, राष्ट्रपतींच्या हस्ते ७ जवानांना ‘पोलीस शौर्य पदक’ प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

          सन्मानित जवानांची नावे अशी आहेत — सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, सफौ/1127 मनोहर कोतला महाका, चापोहवा/977 मनोहर लचमा पेंदाम, पोशि/3311 प्रकाश ईश्वर कन्नाके, पोशि/5415 अतुल सत्यनारायण येगोलपवार, पोशि/5916 हिदायत सदुल्ला खान आणि शहीद पोशि/5210 सुरेश लिंगाजी तेलामी (मरणोत्तर). शहीद सुरेश तेलामी यांनी या कारवाईत दाखवलेले साहस आणि बलिदान दलातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

गडचिरोली पोलीस दलाचा हा मानाचा इतिहास नवीन नाही. मागील पाच वर्षांत या दलाने ३ शौर्य चक्र, २१० पोलीस शौर्य पदके आणि ८ गुणवत्तापूर्ण सेवा पदके मिळवून आपली धाडस आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम ठेवली आहे. नक्षलग्रस्त भागात सतत जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या या दलाच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.

          या गौरवाबद्दल बोलताना गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी म्हटले, “ही पदके केवळ या सात वीर जवानांचा सन्मान नाही, तर संपूर्ण गडचिरोली पोलीस दलाचा अभिमान आहे. आमचे जवान प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, नक्षलवाद्यांचा धोका आणि मर्यादित साधनसामग्री असतानाही जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांचे धैर्य आणि त्याग हा देशासाठी प्रेरणादायी आहे.”

 या घोषणेमुळे गडचिरोली जिल्ह्यात अभिमानाची भावना पसरली असून, शौर्याची ही कथा नक्षलग्रस्त भागातील तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker